🌟आर्थिक लाभासाठी सत्ताधारी आणि विरोधक येथे मौसेरे भाऊ असतात.तिथे सुधारीत आचारसंहिता ही कल्पनाच एक स्वप्न🌟
✍🏻संजय एम.देशमुख,निंबेकर,ज्येष्ठ पत्रकार अकोला
मोबा.क्र. ९८८१३०४५४६
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
अनंत आमिषांची चॉकलेटं वाटत आणि शेतकरी,कष्टकरी, व सर्वसामान्न्यांकडून ओरबाडलेल्या भ्रष्टाचाराच्या कोटयावधी रूपयांच्या उधळणीचा लोकशाहीचा महाराष्ट्रातील तमाशारूपी महोत्सव काल संपला.आता पुढे २३ तारखेची प्रतिक्षा आणि त्यानंतर खोक्यांच्या गर्दीचा बेशरमी घोडेबाजार सुरू होणार आहे...! महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपण्याला काही तासच शिल्लक राहतील अशा शकुनी नीतिच्या पध्दतीने ह्या निवडणुका लावण्यात आलेल्या आहेत.कालच्या विधानसभा निवडणुका जनतेच्या खिशांना कात्र्या लाऊन पळविलेल्या कोट्यावधी रूपयांची धरपकड.....हल्ले....हाणामाऱ्यांच्या आणि अनेक हिंसक प्रदर्शनात पार पडल्या. निवडणुका जिंकण्यासाठी संविधान,लोकशाही आणि न्यायव्यवस्था,तथा कायद्यांच्या सुव्यवस्थांना वेशीवर टांगण्याचे प्रकार घडले.त्यामुळे स्वत:च्या मतलबाच्या पोळ्या शेकणारे राजकीय नेते या देशात व अग्रेसर महाराष्ट्रात सक्रिय असल्याचे परत एकदा दिसले.म्हणजे भारताचे सामाजिक आणि राजकिय,उद्योग तथा संसर्गीत झालेली ईतर क्षेत्रं सुध्दा बेईमान,अनाचारी भ्रष्टाचाऱ्यांना चरण्याचे कुरण आहे, हाच भारताचा जगात सिध्द होत असलेला वर्तमानातील परिचय आहे. म्हणूनच परदेशातील सुधारणांप्रमाणे राजकारणाच्या आचारसंहितेमध्ये बदल करण्याची येथे ईच्छाशक्ती नाही. स्वत:चे भत्ते,सुविधा आणि आर्थिक लाभासाठी सत्ताधारी आणि विरोधक येथे मौसेरे भाऊ असतात.तिथे सुधारीत आचारसंहिता ही कल्पनाच एक स्वप्न ठरते.
एकीकडे भारतीय संकृतीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे अनाचार,भ्रष्टाचार,हिंसाचाराचे आणि भेदभावांच्या कडव्या घोषणातून हिटलरी फतवे जाहिर करीत रहायचे. अशा दुतोंडी राजकारण्यांचे वर्तमानातील सक्रिय आखाडे हे जनतेपेक्षा जास्त स्वत:च्या हितसंबंधांसाठी जीवाचे रान करीत आहेत.यासाठी येथे मतलबाच्या सुपाऱ्या घेणाऱ्यांमध्ये सर्वांनीच उड्या घेतलेल्या आहेत.ज्यांना मार्गदर्शक समजलं जात होतं असे विचारवंत,समाजकारणी आणि ढोंगी महाराजही याला आता अपवाद राहिले नाहीत. राजकारण ही कोणत्याही मार्गाने पैसे कमावणाऱ्या लाचारांचे हक्काचे कुरण झालेलं आहे. म्हणूनच परवा अकोल्यातला महाराज म्हणविला जाणारा तो कालीचरणही त्या जरांगे पाटलांवर सोडला होता. आपले काम काय.... आपण करतो काय याला काही आता धरबंदच राहिलेला नाही..!
काल सायंकाळी ६.०० वाजता एकदाचे मतदान आटोपले आणि साऱ्या उमेदवारांची भाग्यं ईव्हीममध्ये बंद झालीत.यावेळी राज्यात ६५.११ टक्के मतदान झालेलं आहे.हा ३० वर्षातील उच्चांक आहे.सर्वात जास्त म्हणजे ८२ टक्के मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदार संघात तर सर्वात कमी म्हणजे फक्त ४१ टक्के हे कल्याण पश्चिममध्ये झालेलं आहे. राजकीय नेते आणि मंत्री आणि महत्वाच्या व श्रीमंत व्यक्तींचा वावर असणाऱ्या मुंबईतील कुलाब्यामध्ये सुध्दा ४५ टक्केच मतदान झालेलं आहे.आता सायंकाळी २३ तारखेला निकाल जाहिर होतील आणि परत एकदा सत्तासुंदरी प्राप्तीचा महासंग्राम सुरू होईल.परंतू ते सगळं घडवण्यासाठी पध्दतशीर नियोजनातून काही तासच शिल्ल ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या अवधीत सत्ता स्थापन करण्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये घोडेबाजारच्या अनाचाराचे महाभारत सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे क्षेत्र रसातळाला जात असून या सत्ता मिळवण्याच्या आणि सरकारे पाडून सत्तांतराच्या हव्यासाने संविधान आणि लोकशाहीला भुकंपसदृश तडे जातांना दिसत आहेत. हा बिघडलेल्या भ्रष्ट मनोवृत्तींनी येथील शांततावादी समाजाच्या वाट्याला आणलेला फार मोठा दैवदुर्विलास आहे. दारिद्रयात खितपत पडलेल्या घरांमध्ये भाकरी आणि पैशांसाठी एकमेकांच्या छाताडावर बसणारी भावंडं असतात.त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि देशाच्याही राजकारणात सत्तेच्या तुकड्यांसाठी धावाधाव चालू आहे.कर्तव्य,सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी विसरत एकमेकांना संपवून पुढे जाण्यासाठी स्पर्धा करणाऱ्या श्रीमंतांच्या लेकरांचे हे भिकारडे खेळ सुरू आहेत...!
विधानसभा किंवा अन्य निवडणुका ह्या खेळीमेळीच्या वातावरणात होण्याचे दिवस आता ईतिहासजमा झालेले आहेत.राजकारणी आणि कार्यकर्त्यांमधील लोकशाही आणि संविधानाप्रती असलेल्या आदराला ओहोटी लागलेली आहे,सुसंस्कृतता लोप पावत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत आली असून सदाचाराची जागा आता अनाचाराने घेतलेली आहे.या बिघडलेल्या अस्थिर वातावरणात राजकिय ईर्षेने सुडबुध्दी जागृत झाल्या आहेत.म्हणूनच उमेदवार,नेते आणि कार्यकर्त्यांना मारहाण हल्ले अशा प्रकारचे संस्कृतीला गालबोट लावणारे प्रसंग यावेळी जास्त प्रमाणात घडलेले आहेत.नागपूरात काटोलनजीक माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर हल्ला झाला. तर परळी,बिड आणि ईतरत्र सुध्दा मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत. सत्तेतील मंत्री आणि भाजपचे अग्रेसर नेते विनोद तावडे हे पैसे वाटप प्रकरणात अडकले. तर शिंदे सेनेचा नेता नाशिकमध्ये करोडो रुपयांसह पकडला गेला.सत्तेतील मुख्यमंत्र्यांची माणसं आणि मंत्रीच जर अशा प्रकरणात सापडत असतील तर येथील लोकशाही आणि संविधान सुरक्षित आहे का? महाराष्ट्रातील भोळ्या भाबड्या जनतेने आता विश्वास ठेवावा तरी कोणावर? कोणाला प्रामाणिक आणि कोणाला चोर समजावे? ईतरांना चोर म्हणून सीबीआय आणि ईडीमध्ये अडकवणारे आता यावेळी आणि नंतरच्या काळातही अशा अनैतिक उद्योगात समोर येत असतील तर त्यांना विरोधकांना किंवा ईतरांना चोर म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे का? यावर सखोल विचार करण्याची वेळ आता महाराष्ट्रातील जनतेवर आलेली आहे.
यावर्षी वाढलेला मतदानाचा टक्का या बिघडलेल्या परिस्थितीत काय फरक घडवून आणतो हे पाहण्याची विचारवंतांना उत्सुकता आहे. कारण मुजोर नाठाळांना वठणीवर आणायचे कसे याचे मंत्र शोधून काढण्यासाठी साऱ्यांच्याच संशोधनाचे कसब पणाला लागलेले आहे.एखादा भाडेकरू विश्वासाने घरात ठेवला. त्याने मात्र चांगल्या वागणुकीचे गैरफायदे घेत पुढे मुजोर व्हावे आणि माझेच घर म्हणत घरमालकालाच घराबाहेर हाकलावे.असेच प्रकार आज महाराष्ट्राची सत्ता आणि तिचे दावेदार असलेल्या पक्षांमध्ये निर्माण झालेले आहेत.मग याला प्रामाणिक,सदाचारी लोकांचा सत्संगी डेरा किती दिवस म्हणावे? मग ही फुटपट्टी आता लागू होत नाही.तर कुणाचेही पक्ष आणि कुणाचेही नेते पळवून वेगळा घरोबा करणारा़ंचा हा कोणता बाजार म्हणावा? कारण चोर बाजार जर म्हटले तर अनेक जण म्हणतात आम्ही प्रामाणिक आहोत.मग यांच्या या उलट्या बोंबांच्या आरोळ्यांमध्ये प्रामाणिक विश्लेषकही निष्कर्षांच्या व्दिधा मन:स्थितीत गेलेले आहेत. त्यामुळे असंच जर घडत असेल अशा भाडोत्री लोकांवर विश्वास ठेवावा तरी कसा, असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झालेला आहे.
विश्वासावर जग चालते म्हणतात. परंतू ते कालबाह्य ठरत असून येथे अविश्वासाची दगलबाजी करीत यश मिळवणारांची संख्या वाढत आहे.त्यामुळे अशा प्रकारच्या चिरंतन सत्त्याच्या ब्रिदवाक्यांवरील विश्वासही डळमळीत होत आहेत.कारण त्यावर विचार करून नैतिक मुल्ल्यानी पावलं टाकणारांनाही हे लोक गळाला लावत आहेत. अशा दगेबाज लोकांचे संसर्गातून हेच राजकारणी त्यांना बिघडविण्याची कौशल्ये अजमावित आहेत. काळ बदलला आहे.हवेच्या दिशा लोकशाहीला आणि संविधानाला संपविण्याचे संकेत देत आहेत.म्हणून महाराष्ट्रातील जनतेनं आत्ता नेहमीसाठीच जरा जास्त सावध राहिलं पाहिजे.या निवडणुकीत काय केलं हे पाहणं आणि यापासून धडा घेऊन आता पुढेही बदलत राहणं क्रमप्राप्त आहे.परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. येथील संविधानात लोकप्रतिनिधींना कालावधीचे बंधन दिलेले नाही.त्याचे गैरफायदे घेण्याचे प्रमाण फार मोठे आहे.परंतू त्यावर मतदानातून बंधनं आणण्याचा अधिकार मात्र लोकशाहीतील संविधानिक हक्क आहे. तेच ते लोकप्रतिनिधी ईतरांच्या घराणेशाहीवर टीका करत स्वत:च्या मतदारसंघाला मात्र आपलाच गड निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. ईतरांच्या संविधानिक संधी जबरदस्तीने हिसकावत आहेत.म्हणून आयत्या बिळांवरील अशा नागोबांचे गड,त्यांची ती वारूळं जनतेतेने मतदानाच्या अधिकारांनी उध्वस्त केली पाहिजेत.....सुरूंगं लाऊन उडविली पाहिजेत. नाही तर मतदारांच्याच घरात येऊन बसलेले हे उन्मत्त भाडेकरू आमचेच घर म्हणून मालक मतदारांनाच घराबाहेर हाकलतील. हे धोके ओळखून या देशातील मतदार जोपर्यंत सावधगीरीने पावलं टाकणं शिकणार नाही,तोपर्यंत हेच लोक त्याच मतदार राजाला भिकेला लावण्याचे सुरू असलेले उद्योग सोडणार नाहीत...! हे कायम लक्षात ठेऊन चालण्याचा हा काळ आहे...!
0 टिप्पण्या