🌟उदगीर जिल्ह्यासह किनवट अंबाजोगाई जिल्ह्यांची देखील घोषणा होणार काय ? नवीन जिल्हा निर्मितीकडे राज्याचे लक्ष🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याच्या सरकारकडून जोरदार हालचालींना सुरूवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांचा समावेश करून उदगीर हा नवीन जिल्हा निर्माण होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर,अहमदपूर, देवणी, व जळकोट या तालुक्यांचा समावेश नव्या उदगीर जिल्ह्यात होणार आहे. त्याचबरोबर, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि देगलूर या तालुक्यांचे काही भाग विभाजित करून मुक्रमाबाद किंवा बाऱ्हाळी हा नवीन तालुका तयार करण्यात येईल आणि तो उदगीर जिल्ह्यात जोडला जाईल. तसेच जळकोट आणि अहमदपूर तालुक्यांत नांदेडमधील लोहा, कंधार, आणि मुखेड तालुक्यांतील काही गावे समाविष्ट करण्यात येणार आहेत.
उदगीर जिल्ह्याच्या निर्मितीचा प्रस्ताव मागील सरकारच्या कार्यकाळातच पुढे आला होता. मात्र, तेव्हा काही राजकीय कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता हा प्रस्ताव पुन्हा चर्चेत असून २६ जानेवारी २०२५ रोजी संभाव्य जिल्ह्यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आमदार संजय बनसोडे यांनी जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असलेली कार्यालये, इमारती आणि इतर सोयी-सुविधा यांचे नियोजन केले आहे. याशिवाय, एमएच ५५ अशी जिल्ह्याची नवीन वाहतूक क्रमांक ओळख मागील टर्ममध्येच निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकार नवीन उदगीर जिल्ह्यासह मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या किनवट अंबाजोगाई या नवीन जिल्ह्यांची देखील घोषणा करणार काय ? असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित होत असून नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन किनवट जिल्ह्याची निर्मिती झाल्यास नांदेड पासून केवळ २९ किलोमीटर अंतरावर असलेल्या पुर्णा तालुक्याचा देखील नांदेड जिल्ह्याच समावेश करण्यात यावा अशी देखील मागणी आता समोर येत आहे नवीन उदगीर जिल्ह्यात उदगीर,अहमदपूर,देवणी,जळकोट,मुक्रमाबाद किंवा बाऱ्हाळी या पाच तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे......
0 टिप्पण्या