🌟राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्याचे स्वागताध्यक्ष विनोद बोराडे यांनी दिली🌟
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा व आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू असून सेलू शहर राज्यातून येणाऱ्या पत्रकारांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी दिली आहे.
मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या वतीने दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सेलू येथील साई नाट्यमंदिरात राज्यातील 256 तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचा राज्यस्तरीय मेळावा तसेच राज्यात आदर्श काम करणाऱ्या तालुका व जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. या मेळाव्याच्या स्वागताध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची निवड झाली असून त्यांनी या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे. साई नाट्य मंदिर येथे सहाशे पत्रकारांची बैठक व्यवस्था असून पत्रकारांची निवास व्यवस्था व्यंकटेश मंदिर सेलू येथे करण्यात आली आहे. या मेळाव्याच्या तयारीवर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचे लक्ष असून याबाबत ते रोज आढावा घेत आहेत. सभागृह आणि निवासव्यवस्था यांचे नियोजन झाले आहे. कार्यक्रमासाठी लागणाऱ्या इतर बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू शहरातील सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके , लक्ष्मण मानोलीकर, राजू हट्टेकर, जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास, कांचन कोरडे, मोहसिन अहमद, सतीश आकात, नीरज लोया,निसार पठाण हे दररोज तयारीचा आढावा घेत आहेत. मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे हे दररोज सेलू पत्रकार संघाच्या संपर्कात आहेत. सेलू शहर हे एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक नगरी असल्याने या भागातील नागरिक तसेच सर्व राजकीय प्रतिनिधी राज्यभरातून पत्रकारांच्या स्वागतासाठी इच्छुक असल्याचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी यावेळी बोलून दाखवले.......
0 टिप्पण्या